वकीलांवरील हल्ल्यांचा निषेध! दहिवडी वकील संघ ३ नोव्हेंबर रोजी कामकाजापासून अलिप्त राहणार
दहिवडी:भरारी वृत्तसेवा
राज्यात अलीकडच्या काळात वकीलांवर होत असलेल्या वारंवार हल्ल्यांचा निषेध म्हणून बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत दहिवडी वकील संघ येत्या ३ नोव्हेंबर २०२५ रोजी न्यायालयीन कामकाजापासून पूर्णपणे अलिप्त राहणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब सावंत, उपाध्यक्ष अॅड. मिनेश पाटील व सचिव अॅड. गणेश देवकुळे यांनी दिली.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील वकीलांवर प्राणघातक हल्ल्यांच्या घटना वाढत असून, काही ठिकाणी वकीलांना जीव गमवावा लागला आहे. नुकतीच अहमदनगर (अहिल्यानगर) येथे देखील किरकोळ कारणावरून एका वकिलावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनांनी वकीलवर्गात तीव्र संताप निर्माण झाला आहे.
वकीलांच्या सुरक्षेसाठी “अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट” तातडीने लागू करण्यात यावा, ही वकील संघटनेची प्रमुख मागणी असून, यासाठी राज्यभरात निषेध आंदोलनांचे आयोजन करण्यात आले आहे. दहिवडीतील वकील संघानेही या मागणीसाठी आपला पाठिंबा दर्शवत शांततामय आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर ३ नोव्हेंबर रोजी दहिवडी न्यायालयातील सर्व वकील कामकाजापासून दूर राहून शासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधणार आहेत. वकीलांना कायदेशीर संरक्षण मिळावे, यासाठी हे आंदोलन राज्यभरातील न्यायालयांमध्ये एकसंध पद्धतीने होणार आहे.

