@अटीतटी च्या लढतीत राष्ट्रवादी ची मुसंडी
@ना जयकुमार गोरे यांना विचार करायला लावणारी निवडणूक
@कुकुडवाड गटात देसाई फॅक्टर कायम
@पळशी गणात शेवट पर्यंत थरार
@ आंधळी व बिदाल मध्ये भाजपचा दबदबा
@शेखर गोरे यांच्या पत्नीचा विक्रमी विजय
@ राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा तालुक्यात फ्रंटफुट वर
दहिवडी भरारी वृत्तसेवा
माण तालुक्यात एकतर्फी वाटणारी निवडणूक अखेर जबरदस्त अटीतटीची झाली असून नामदार जयकुमार गोरे यांचा विजयाचा वारू रोखत राष्ट्रवादी काँग्रेस ने जोरदार मुसंडी मारली. व माण तालुक्यात अभूतपूर्व यश मिळवले. मार्डी,कुकुडवाड दोन्ही गट राष्ट्रवादी काँग्रेस ने एकतर्फी जिंकले. तर गोंदवले गट व गण देखील राष्ट्रवादी काँग्रेस ने एकहाती जिंकले मात्र पळशी गणात भाजपाने विजय मिळवला भाजप ने आंधळी व बिदाल गट राखले. दोन्ही गटात भाजप चा च दबदबा असल्याचे सिद्ध झाले. पंचायत समिती मध्ये दोन्ही पक्षांना समान पाच पाच विजय मिळाले आहेत. एकूण च तालुक्याचे राजकीय चित्र पाहता नामदार जयकुमार गोरे यांना जमिनीवर आणणारी व विचार करायला लावणारी ही निवडणूक ठरली.
माण तालुक्यातील कुकुडवाड गटाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.गेली वीस वर्षे कुकुडवाड गट ताब्यात ठेवणाऱ्या अनिल देसाई यांना भाजप च्या अरुण गोरे यांनी जोरदार टक्कर दिली परंतु शेवटी अनिल देसाई यांनी पुन्हा एकदा बाजी मारत 671 मतांनी विजय मिळवला.कुकुडवाड हा आपला गड असल्याचे सिद्ध केले.
त्यांनी आपल्याबरोबरच वरकुटे मलवडी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम शिंगाडे 434 मतांनी विजयी केले.तर कुकुडवाड गणात विद्या काटकर 113 मतांनी विजय मिळवला.अनिल देसाई हेच कुकुडवाड गटाचे हिरो असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले.
शेवटच्या फेरीपर्यंत येथील निवडणूक रंगतदार झाली आहे.बाहेरचा उमेदवार व एकमेव खुल्या असणाऱ्या गटात ओबीसी उमेदवार दिल्याची चर्चा सुरुवातीपासूनच होती.मतदारांनी याच मुद्द्यावर भाजपला कात्रज चा घाट दाखवला.
मार्डी गटात ही मोठी चुरशीची व अटीतटीची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस च्या सोनाली मनोज पोळ यांनी भाजपा च्या डॉ भारती संदीप पोळ यांना 768 मतांनी पराभूत केले.मार्डी गटाची निवडणूक लागल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोज पोळ यांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला होता प्रचारात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती त्यामानाने भारतीय जनता पार्टीच्या सोनाली पोळ यांचा प्रचार धीम्या गतीने सुरू होता.त्यातच भाजपने मार्डी गणाचा उमेदवार वरकुटे म्हसवड गणात उभा केला व वरकुटे म्हसवड गणातील उमेदवार मार्डी गणात उभा केला. त्याचा परिणाम ही मतदानावर झाल्याची चर्चा आहे.त्यातच मनोज पोळ यांनी प्रचाराची यंत्रणा व्यवस्थित हाताळली त्यांनी ना. जयकुमार गोरे यांचा डाव त्यांच्यावर च उलटवण्याची किमया साधण्यात यश मिळवले.स्व. सदाशिवराव पोळ तात्या यांचा बालेकिल्ला राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला यश आले.एव्हढेच नव्हे तर मार्डी गणाच्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रियांका जगदाळे या 1428 मतांनी विजयी झाल्या. तर वर वरकुटे म्हसवड गणाच्या उमेदवार कल्पना विरकर या 208 मतांनी विजयी झाल्या.
गेल्या 50 वर्षात मार्डी गट स्व.सदाशिव राव पोळ यांच्या ताब्यात होता.राष्ट्रवादी चा बालेकिल्ला राखण्यात मनोज पोळ यांना यश आले.
गोंदवले गट हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यांनी मागच्या वेळी या गटातील तिन्ही उमेदवारांना विजयी केले होते.यावेळी गोंदवले गट हा राखीव झाल्याने गोंदवले येथील च माजी सभापती बापुराव रणपिसे यांच्या घरातील शीतल रणपिसे यांना उमेदवारी दिली.त्यांनी भाजप च्या सावित्री शिलवंत यांचा 619 मतांनी पराभव केला. राखीव असलेल्या गोंदवले गणात ही जेष्ठ नेते व दोन वेळेचे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेल्या दिलीप तुपे यांच्या कन्या गौरी तुपे यांना उमेदवारी दिली. गौरी तुपे यांनी अनिता तुपे यांचा 665 मतांनी पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस ने बरोबर समतोल साधल्याने दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.
पळशी गणात मात्र काटे की टक्कर झाली अगदी सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र खाडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मानसिंग खाडे यांच्यात मतांची चढाओढ होत होती. अगदी शेवट च्या फेरी पर्यंत ही रंगत चांगली झाली.शेवटची फेरी निर्णायक होऊन भाजपचे डॉ राजेंद्र खाडे हे 132 मतांनी विजयी झाले.
आंधळी गट हा नामदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.येथून भाजप च्या सोनल शेखर गोरे यांनी जोरदार विक्रमी बाजी मारत 18 हजार 581 मतांनी विजय मिळवला.
आंधळी गण तर भाजपा ने बिनविरोधच काढला होता तेथून अर्जुन काळे हे बिनविरोध विजयी झाले होते.मलवडी गणात गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय मगर यांनी येथून विजय मिळवला होता.मात्र यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस या गणात स्ट्राँग नव्हती त्यातच भाजपा ने परकंदीचे सरपंच व ज्येष्ठ नेते बाळासाहेब कदम यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रवादीने मलवडीचे जयदीप कुमार मगर यांना उमेदवारी दिली.भाजपचे बाळासाहेब कदम येथून 7230 एवढ्या मोठ्या मतांनी विजयी झाले.
बिदाल गट हा देखील नामदार जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या उमेदवार अलका बाळकृष्ण जगदाळे या तब्बल 9968 मतांनी सहज विजयी झाल्या.बिदाल गणातून भाजप च्या बिजवडी येथील सरपंच उषा भोसले यांनी 3847 मतांनी विजयी मिळवला.तर
वावरहिरे गणात भाजप चे शिखर शिंगणापूर चे माजी सरपंच राजाराम बोराटे यांनी वावरहिरे चे सरपंच शामराव राऊत यांचा 2525 मतांनी पराभव केला.
वावरहिरे हा गण व बिदाल गट गेल्या तीन निवडणुका ना जयकुमार गोरे यांनाच साथ देत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस ला ऊर्जा देणारी निवडणूक
माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एकी नसल्याने अनेकवेळा पराभव झाला आहे. परंतु या निवडणुकीत सर्वच नेत्यांनी आपापले गड राखले आहेत.प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गोंदवले गट राखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला यश आले. कुकुडवाड गटाचे नेते अनिल देसाई यांनी तिन्ही जागांवर विजय मिळवत गड राखला.
मार्डी गटात मनोजकुमार पोळ यांनी मार्डी गट राखला.प्रत्येक निवडणुकी मध्ये होत चाललेली राष्ट्रवादी काँग्रेस ची हार रोखण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला यश आले असून तालुक्यातील पंधरा जागा पैकी आठ जागा मिळवत भाजपला मागे टाकण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ला यश आले आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ला तालुक्यात पुन्हा ऊर्जा प्राप्त झाली आहे.

