ना.जयकुमार गोरे यांना पराभवाचा धक्का; माण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडे
सभापतीपदी विक्रम शिंगाडे, उपसभापतीपदी प्रियांका जगदाळे
दहिवडी : भरारी वृत्तसेवा
माण पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीने सोमवारी तालुक्याच्या राजकारणात मोठा उलटफेर घडवला. चुरशीच्या लढतीनंतर दोन्ही बाजूंना समान मते पडल्याने अखेर चिठ्ठीद्वारे निकाल लागला आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे सभापतीपदी तर प्रियांका जगदाळे उपसभापतीपदी विजयी ठरल्या. महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या राजकीय बालेकिल्ल्यातच होम पिचवर भाजपला पराभवाचा धक्का बसल्याने तालुक्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला तालुक्यात सत्ता मिळाल्याने ऊर्जा व बळ मिळाल्याचे सिद्ध झाले.
काही महिन्यांपूर्वी म्हसवड नगरपालिकेची निवडणूक एकतर्फी जिंकून विरोधकांना नामोहरम करण्यात नामदार जयकुमार गोरे यांना यश आले होते. त्यानंतर भाजपचा राजकीय वारू तालुक्यात सर्वत्र दौडू लागला होता.ना. गोरे यांच्या बंगल्यावर दररोज कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये प्रवेश सुरू होते. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका भाजप एकतर्फी जिंकेल, अशी चर्चा सुरुवातीला रंगली होती.
मात्र राजकारणात “अति आत्मविश्वास हा पराभवाचा जनक ठरतो” असे म्हटले जाते. उमेदवारी देताना झालेल्या काही चुका, मतदारांना गृहीत धरणे आणि स्थानिक पातळीवरील नाराजी याचे परिणाम भाजपला या निवडणुकीत भोगावे लागल्याचे राजकीय निरीक्षक सांगत आहेत.
याउलट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र वेगळीच घडामोड घडली. ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप तसेच स्व. सदाशिवराव पोळ यांचे सुपुत्र मनोज पोळ या सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला. म्हसवड नगरपालिकेतील पराभव जिव्हारी लागल्यानंतर राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने एकीची भूमिका घेत योग्य उमेदवार उभे केले. त्याचा परिणाम म्हणजे बलाढ्य भाजपला थोपवण्यात राष्ट्रवादीला यश आले आणि पंचायत समितीत बरोबरी साधली.
“राजकारणात एकी हीच खरी शक्ती असते” हे या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
दोन्ही पक्षांचे प्रत्येकी पाच सदस्य निवडून आल्याने सभापती व उपसभापती निवडीकडे संपूर्ण तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. भाजपकडून सभापती पदासाठी अर्जुन काळे व बाळकृष्ण उर्फ बाळासाहेब कदम यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विक्रम शिंगाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उपसभापती पदासाठी भाजपकडून डॉ. राजेंद्र खाडे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रियांका जगदाळे यांनी अर्ज भरला.
छाननी नंतर भाजपचे उमेदवार बाळासाहेब कदम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर झालेल्या मतदानात दोन्ही बाजूंना समान पाच-पाच मते पडली. परिणामी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे निकाल काढण्यात आला. या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम शिंगाडे विजयी ठरले.
उपसभापती पदासाठीही तसाच पेच निर्माण झाला. समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निकाल काढण्यात आला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रियांका भुजंगराव जगदाळे विजयी झाल्या.
विजयानंतर सभापती विक्रम शिंगाडे व उपसभापती प्रियंका जगदाळे यांनी तात्काळ पदभार स्वीकारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, मनोज पोळ यांच्यासह तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या अभूतपूर्व विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अनेक निवडणुकांनंतर मिळालेल्या या मोठ्या यशामुळे कार्यकर्त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. गुलालाची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात विजयी उमेदवारांची सिद्धनाथ मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
प्रसिद्ध साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे एक वचन येथे आठवते —
“यश मिळवण्यासाठी एकत्र येणे ही सुरुवात असते, एकत्र राहणे ही प्रगती असते आणि एकत्र काम करणे म्हणजेच यश होय.”
माण पंचायत समितीच्या या निकालाने त्या विचाराला जणू राजकीय रूप दिले असल्याचे अनुभवयास मिळाले.
खुल्या जागांवर ओबीसींना स्थान
माण पंचायत समितीचे सभापती पद खुले असताना दोन्ही पक्षांनी ओबीसी समाजातील उमेदवारांना संधी दिल्याची चर्चा पंचायत समितीच्या आवारात रंगली. खुल्या जागांवर अतिक्रमण वाढत चालले असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू असून या निवडणुकीत त्याचा परिणाम दिसल्याचेही बोलले जात आहे.
सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य : विक्रम शिंगाडे
सभापतीपदी निवड झाल्यानंतर बोलताना विक्रम शिंगाडे म्हणाले, “हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. पंचायत समितीमार्फत जनतेच्या कामांना प्राधान्य देऊन विकासाची गती वाढवण्याचा प्रयत्न करू. राष्ट्रवादी काँग्रेसचा हा विजय स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या चरणी समर्पित करतो. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

