- 🚨 ‘आता तरी जागे व्हा!’ – ना. जयकुमार गोरे यांचा संताप; अपूर्ण रस्ते कामांवर थेट अल्टिमेटम 🚨
दहिवडी : भरारी वृत्तसेवा
सातारा ते पंढरपूर आणि लातूर मार्गावरील रखडलेल्या कामांमुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ना. जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत तात्काळ कामे पूर्ण करण्याचा कठोर अल्टिमेटम दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा मुद्दा आक्रमकपणे मांडण्यात आला.
या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, अरुण गोरे (आबा), धैर्यशीलदादा कदम, ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी व ५४८ ई अंतर्गत सातारा–लातूर व सातारा–पंढरपूर मार्गावरील अनेक ठिकाणची कामे अपूर्ण असल्याने गंभीर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः माण तालुक्यातील धुळदेव, गोंदवले, दिवड, पळशी आणि चिमणगाव येथे निर्माण झालेले ‘ब्लॅक स्पॉट’ जीवघेणे ठरत असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
धुळदेव येथील भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या ठिकाणी आतापर्यंत ५० हून अधिक अपघात होऊन १५ जणांचा मृत्यू, तर ६० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत, ही धक्कादायक माहितीही यावेळी समोर आली.
ना. गोरे यांनी दिवड येथील अपूर्ण पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरते डांबरीकरण करण्याच्या सूचना दिल्या. पळशी येथे ५० मीटर अपूर्ण रस्त्यावर तातडीने उपाययोजना करणे, गोंदवले येथील नियमबाह्य गतीरोधक हटवून योग्य निकषांनुसार बसविणे, तसेच चिमणगाव येथील धोकादायक ३० मीटर ब्लॅक स्पॉटवर तात्काळ काम करण्याचे आदेश देण्यात आले.
याशिवाय पिलीव ते पंढरपूर दरम्यान ज्या ठिकाणी महामार्गाचे काम रखडले आहे, तेथे तातडीने डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. आवश्यक त्या ठिकाणी आठवडाभरात तात्पुरते रस्ते, पर्यायी वळण मार्ग उभारण्याचे निर्णयही बैठकीत घेण्यात आले.
धुळदेव येथील रस्ता व पळशी येथील पुलाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले असले, तरी “कामे वेळेत पूर्ण झाली नाहीत, तर जबाबदारांवर कारवाई अटळ,” असा इशारा ना. जयकुमार गोरे यांनी यावेळी दिला.

