- नातेपुतेजवळ भीषण अपघात : कॅनॉलमध्ये कार कोसळून तिघांचा मृत्यू; माण तालुक्यातील पती-पत्नींसह मुलीचा दुर्दैवी अंत
दहिवडी: भरारी वृत्तसेवा
माण तालुक्यावर शोककळा पसरवणारी हृदयद्रावक घटना नातेपुते परिसरात घडली आहे. मुंबईहून गावी येणाऱ्या कुटुंबावर काळाने झडप घालत पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. नातेपुतेजवळील कॅनॉलमध्ये कार कोसळून तिघांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे.
आज पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईहून फोंडशिरसकडे निघालेली ईर्टिगा कार अचानक नियंत्रण सुटून कॅनॉलमध्ये कोसळली. या भीषण अपघातात मंजुळा जठार आणि हनुमंत जठार (मूळ रा. मोगराळे, ता. माण) या पती-पत्नींसह त्यांची मुलगी प्रीती टिळेकर (रा. खारघर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
माहितीनुसार, रामनवमीच्या निमित्ताने कुटुंबीय फोंडशिरस येथे यात्रेसाठी आले होते. यात्रा आटोपल्यानंतर परतीच्या तयारीत असताना मुलाला मामाकडे ठेवण्यात आले होते. त्याला परत घेण्यासाठी सुनील टिळेकर हे रात्री खारघरहून निघाले होते. मात्र नियतीने वेगळेच काही ठरवले होते.
या अपघातात चालक असलेले सुनील टिळेकर हे थोडक्यात बचावले, मात्र त्यांच्या डोळ्यासमोर पत्नी, आई आणि वडिलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेने मोगराळे गावासह संपूर्ण माण तालुका शोकमग्न झाला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गावात शोकाकुल वातावरण असून, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांत तीव्र संवेदना व्यक्त होत आहेत.

