भेसळखोरांनो सावधान! तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवाईला रयत क्रांती संघटनेचा दुधाभिषेकातून सलाम
दुधातील भेसळीविरोधातील मोहिमेचे जोरदार स्वागत; शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, अशीही मागणी
दहिवडी भरारी वृत्तसेवा :राज्यात दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचे रयत क्रांती संघटनेच्या वतीने सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांच्या छायाचित्राला दुधाचा अभिषेक करून त्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले. व त्यांचा कामाला पाठिंबा दिला.

यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दुधातील भेसळ कोणत्याही परिस्थितीत थांबली पाहिजे. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर कठोरात कठोर कारवाई होणे ही काळाची गरज आहे. भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने आणखी कठोर पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली.
रयत क्रांती संघटनेने शुद्ध दूध उत्पादनासाठी रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या शेतकऱ्यांचाही प्रश्न अधोरेखित केला. भेसळखोरांमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत असून त्यांच्या दुधाला योग्य व हमीभाव मिळणे आवश्यक असल्याचे संघटनेने नमूद केले.
राज्यात सुरू असलेल्या या व्यापक कारवाईचे स्वागत करताना संघटनेने तुकाराम मुंडे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करण्यात आले.
तुकाराम मुंडे यांच्या धडाकेबाज कारवाईची राज्यभर चर्चा
प्रशासनावर मजबूत पकड आणि निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांनी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरोधातील कारवायांना वेग आला आहे. दूध, खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंमध्ये भेसळ करणाऱ्या अनेक उद्योग व आस्थापनांवर विभागाची करडी नजर असून त्यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत.
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या त्यांच्या भूमिकेचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी सुरू असलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, ही कारवाई आणखी व्यापक करण्याची अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

