
@आषाढी वारीपूर्वी प्रशासनाला सज्जतेचे आदेश; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विकासाला वेग
@वारकऱ्यांसाठी सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षा प्रथम
@मंदिर परिसराच्या ३,९९३.९० कोटींच्या विकास आराखड्यासाठी वास्तुविशारद नियुक्तीचे निर्देश
भरारी वृत्तसेवा:(संपादक, राजेश इनामदार)
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रविवारी (दि. २८) पंढरपूर व वाखरी येथे विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला सज्जतेचे स्पष्ट निर्देश दिले. वाखरी पालखीतळ, भक्तीसागर (६५ एकर), चंद्रभागा नदीपात्र, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर तसेच विकास आराखड्याच्या बैठकीत त्यांनी आषाढी यात्रेदरम्यान लाखो वारकरी-भाविकांना सुरक्षित, स्वच्छ, सुविधायुक्त आणि सुरळीत सेवा मिळण्यासाठी कोणतीही कुचराई होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य आराखड्यासाठी मंजूर ३,९९३.९० कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तातडीने वास्तुविशारद नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वाखरी पालखीतळ, भक्तीसागर (६५ एकर), चंद्रभागा नदीपात्र आणि पालखी मार्गाची पाहणी करताना पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा, निवास, वाहतूक, सुरक्षा, प्रकाश व्यवस्था, रस्ते आणि इतर मूलभूत सुविधांचा आढावा घेतला. पालखीतळावरील खड्डे बुजविणे, मुरमीकरण, काँक्रिटीकरण, कायमस्वरूपी जलनिस्सारण व्यवस्था, स्वच्छ शौचालये, रस्त्यांची दुरुस्ती, डिव्हायडर रंगकाम, काटेरी झुडपे हटविणे, नदीपात्र स्वच्छ करणे आणि यात्रेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कॉलेज चौकातील अपूर्ण पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देताना संबंधित ठेकेदाराने विलंब केल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. सरगम चौक ते वाळवंट रस्ता, ६५ एकर परिसरातील सुविधा आणि शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
त्यानंतर पालकमंत्री गोरे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पाहणी करून पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व विकासकामांचा आढावा घेतला. आषाढीपूर्वी सर्व कामे पूर्ण करून दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पाहणीनंतर त्यांनी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे मुखदर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यानंतर नियोजन भवनात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व वाणिज्य आराखड्याबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्य शासनाने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी एकूण ३,९९३.९० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढील चार दिवसांत स्पर्धात्मक निविदा प्रक्रिया राबवून वास्तुविशारद नियुक्त करावा, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले. वास्तुविशारदाचा आराखडा प्रथम जिल्हास्तरीय समितीसमोर आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बैठकीत वारकऱ्यांसाठी समग्र सुविधा, मंदिर कॉरिडॉर, नदीघाट विकास, वाहतूक व्यवस्था, शहर सुशोभीकरण, पालखी तळांचा विकास, पुनर्वसन, भूमिसंपादन आदी विविध घटकांसाठी मंजूर निधीचे सादरीकरण करण्यात आले. याचबरोबर ६५ एकर परिसरात उभारण्यात येणाऱ्या श्री संत नामदेव महाराज स्मारकासाठी ९९.९९ कोटी रुपयांच्या कामांना जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिल्याची माहितीही पालकमंत्री गोरे यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी व संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
आषाढीपूर्वी पालकमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश
वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था सक्षम करावी.
पालखीतळावरील सर्व खड्डे बुजवून सपाटीकरण करावे.
काँक्रिटीकरण, प्रकाश व्यवस्था व जलनिस्सारणाची कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
कॉलेज चौक पुलाचे काम तातडीने पूर्ण करावे; विलंब झाल्यास कारवाई.
चंद्रभागा नदीपात्र, घाट व शहर परिसर स्वच्छ ठेवावा.
मंदिर परिसरातील सर्व विकासकामे आषाढीपूर्वी पूर्ण करावीत.
चौकट
३,९९३.९० कोटींच्या विकास आराखड्याची प्रमुख वैशिष्ट्ये
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर व पंढरपूर कॉरिडॉरचा सर्वांगीण विकास.
वारकऱ्यांसाठी आधुनिक सुविधा व पालखी तळांचा विकास.
नदीघाटांचे सुशोभीकरण व वाहतूक व्यवस्थेचा विस्तार.
शहर सुशोभीकरण, व्यापारी संकुल, पूल व हेलिपॅड उभारणी.
पुनर्वसन व भूमिसंपादनासाठी स्वतंत्र मोठी तरतूद.
६५ एकर परिसरात ९९.९९ कोटींचे श्री संत नामदेव महाराज स्मारक. :::

