कोरेगाव हादरलं! तहसील कार्यालयात लाचखोरीचा स्फोट ; पुरवठा निरीक्षण अधिकारी रंगेहाथ जाळ्यात
कोरेगाव भरारी वृत्तसेवा:
प्रशासनाच्या नावावर काळिमा फासणारी धक्कादायक घटना कोरेगाव तहसील कार्यालयात उघडकीस आली आहे. जनतेची सेवा करण्याची जबाबदारी असलेलाच अधिकारी लाच घेताना पकडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अत्यंत धाडसी सापळा रचत तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुरवठा निरीक्षण अधिकारी आणि त्याच्या साथीदाराला रंगेहाथ पकडले.
या प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी आनंद कैलास शिंदे (पुरवठा निरीक्षण अधिकारी, तहसील कार्यालय, कोरेगाव) आणि त्याचा हस्तक अवधुत दिलीप कालेकर (खाजगी इसम) यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शिंदे याने सुरुवातीला तब्बल २ लाख रुपयांची मागणी करून तक्रारदाराला अक्षरशः वेठीस धरल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची कोरेगाव येथे गॅस एजन्सी असून गोडाऊन तपासणी टाळण्यासाठी आणि तक्रारींवर कारवाई न करण्यासाठी शिंदे याने पैशांची उघड मागणी केली. भीतीपोटी तक्रारदाराने आधीच २५ हजार रुपये दिले होते. मात्र, अधिक पैशांची मागणी वाढत गेल्याने अखेर तक्रारदाराने ACB कडे धाव घेतली.
१ एप्रिल रोजी झालेल्या पडताळणीत शिंदे याने तडजोडीच्या नावाखाली १ लाख २५ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ६ एप्रिल रोजी ACB ने सापळा रचून एका बँकेच्या परिसरात ही कारवाई केली. शिंदे यांच्या सांगण्यावरून कालेकर याने पंचासमक्ष लाच स्वीकारताच पथकाने दोघांनाही जेरबंद केले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली गणेश ताटे, निलेश राजपुरे, विक्रमसिंह कणसे, सत्यम थोरात, नवनाथ शिंदे आणि चालक महेश पुजारी यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. या प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक सुप्रिया गावडे करत असून उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या पर्यवेक्षणाखाली कारवाई पार पडली. अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून सामान्य नागरिकांनी अशा प्रकारच्या लाचखोरीविरोधात निर्भीडपणे तक्रार करावी, असे आवाहन ACB कडून करण्यात आले आहे.

