कुळकजाई कुस्ती मैदानात सिकंदर शेखचा जलवा; ‘एकचाक’ डावाने अमित कुमार चितपट
दहिवडी भरारी वृत्तसेवा: 
माण तालुक्यातील कुळकजाई येथे श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त भरलेल्या भव्य कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने पंजाब केसरी अमित कुमार याला अवघ्या १२ मिनिटांत ‘एकचाक’ डावावर चितपट करत मैदान गाजवले. या रोमहर्षक लढतीने हजारो कुस्तीप्रेमींचे डोळे खिळवून ठेवले.
या मैदानातील पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी ३ लाख ५१ हजार रुपयांचे इनाम सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी ठेवले होते. त्यामुळे या कुस्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. सुरुवातीपासूनच दोन्ही पैलवानांनी आक्रमक खेळ करत एकमेकांचा अंदाज घेतला; मात्र सिकंदर शेख याने आपल्या चपळतेचा अचूक वापर करत ‘एकचाक’ डावावर अमित कुमारला चितपट केले. त्याच्या या प्रभावी विजयाने मैदानात एकच जल्लोष उसळला.
दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत आटपाडीच्या सचिन काळे याने पुण्याच्या रामा कांबळेवर ‘कलाजंग’ डावाचा वापर करत विजय मिळवला. तसेच कुंदन पोतेकर याने सुदर्शन आलदरवर मात केली, तर प्रज्योत कचरे याने रुद्र मानेवर विजय मिळवत आपली सरशी सिद्ध केली.
या भव्य कुस्ती मैदानाला जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापू लोखंडे व नामदेव बोडरे, उप महाराष्ट्र केसरी किरण भगत, ऑल इंडिया चॅम्पियन विकास गुंडगे, महाराष्ट्र चॅम्पियन जयदिप गायकवाड, कर्नाटक केसरी कांता तरंगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हलगीचा कडकडाट, पैलवानांचे शड्डू आणि प्रा. राजेंद्र जगदाळे यांच्या बहारदार निवेदनामुळे मैदानात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कुळकजाई परिसरातील ग्रामस्थ, यात्रा कमिटी व कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानाचे नेटके आयोजन केले.

