दहिवडीचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या भव्य रथयात्रेला आज उत्साहात प्रारंभ झाला. “श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलं… नाथाच्या नावानं चांगभलं…” या गजराने संपूर्ण दहिवडी परिसर दुमदुमून गेला. गुलाल व खोबऱ्याची उधळण, ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीभावाच्या वातावरणात हजारो भाविकांनी दर्शन घेत रथयात्रेचा आनंद लुटला.
लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील भाविक मोठ्या श्रद्धेने रथयात्रेत सहभागी झाले होते. दहिवडी परिसर यात्रेमुळे अक्षरशः फुलून गेला आहे.
देवांचे मुख्य सेवक विठ्ठल चौगुले यांच्या घरातून श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांच्या मूर्तींचे विधीवत पूजन करून सकाळी सुमारे ११ वाजता मूर्ती रथामध्ये ठेवण्यात आल्या.त्यानंतर मान्यवरांनी रथाचे पूजन केल्यावर मिरवणुकीस सुरुवात झाली. त्यानंतर “सिद्धनाथ महाराज की जय” च्या घोषात भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने रथ ओढत मिरवणूक पुढे नेली.
रथावर गुलाल, खोबरे उधळत भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. नारळांची तोरणे, नोटांच्या माळा आणि देणग्या अर्पण करून श्रद्धेची अभिव्यक्ती करण्यात आली. रथमार्गावर ठिकठिकाणी महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून रथाचे स्वागत केले.
मिरवणुकीत ढोल, लेझीम, गजी, बेंजो, ब्रासबँड, झांजपथक यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात संपूर्ण दहिवडी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली.
रथ मिरवणूक बाजारपटांगण, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक परिसर, पंचायत समिती, वेताळपुरा, तेल्ली गल्ली, मराठी शाळा, गणपती मंदिर (गणेश पेठ) मार्गे फिरून रात्री उशिरा मंदिर परिसरात परतली. यात्रेदरम्यान दहिवडी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
संध्याकाळनंतर दर्शनासाठी मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. श्री सिद्धनाथाला नारळ तोरण बांधण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती. मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला असून विविध खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य, खेळणी यांचे स्टॉल्स यात्रेचे आकर्षण ठरत आहेत. बालगोपाळांसाठी पाळणे व विविध खेळण्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे.ही यात्रा तीन दिवस चालणार असून शनिवारी कुस्त्यांचे मैदान आणि रविवारी बैलगाडा शर्यत यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने दहिवडीत सध्या उत्सवाचे, आनंदाचे आणि भक्तिभावाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे.

