ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना राज्यस्तरीय ‘प्रशासनरत्न’ पुरस्काराने सन्मानित
दहिवडी भरारी वृत्तसेवा
: येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजकुमार डोंबे यांना दर्शक महोत्सवानिमित्त प्रतिष्ठा फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय ‘प्रशासनरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तासगाव येथे हजारोंच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांच्या कार्याची सर्वत्र दखल घेतली जात आहे.
गेल्या ४५ वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डोंबे यांनी मागासवर्गीय, दलित, वंचित घटक तसेच महिला, बेरोजगार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठवला आहे. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी कायदेशीर मार्गाने लढा देत शेकडो पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. विविध कंपन्यांमधील मोठे घोटाळे उघड करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे.
यापूर्वी त्यांना ‘समाजरत्न’, ‘समाजगौरव’, ‘कवीरत्न’ अशा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सातारा, उद्योजकता विकास केंद्र औरंगाबाद, आधार बहुउद्देशीय संस्था अहमदनगर, लेक लाडकी अभियान, जिल्हा उद्योग केंद्र तसेच पोलीस अधीक्षक यांच्या वतीनेही त्यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. गोरगरिबांचा मसीहा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
डोंबे यांनी आतापर्यंत ७५ हून अधिक आंदोलने विविध विषयांवर यशस्वीपणे राबवली असून प्रशासन दरबारी ठामपणे आवाज उठवला आहे. कोणतेही प्रकरण हातात घेतल्यावर त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत, अशी त्यांची कार्यपद्धती आहे. कायद्याच्या सखोल अभ्यासातून ते प्रत्येक प्रकरणाला न्याय मिळवून देतात. अडचणींच्या काळातही संयमाने व संवादातून मार्ग काढण्यावर त्यांचा भर असतो.
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी त्यांनी भोंदू महाराज, बुवाबाजी करणाऱ्यांविरुद्ध ठोस कारवाईचा बडगा उभारला असून अनेक प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात यश मिळवले आहे. जीवाची पर्वा न करता त्यांनी अनेक संकटांवर मात करत हजारो लोकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या कार्याची नोंद आणि पुरावे त्यांनी व्यवस्थित जतन करून ठेवले आहेत.
“जनसेवा हीच ईश्वरसेवा” या ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. स्वतःच्या अनुभव, अभ्यासपूर्ण मांडणी आणि उत्कृष्ट लिखाणाच्या जोरावर अनेक गुंतागुंतीची प्रकरणे त्यांनी यशस्वीपणे हाताळली आहेत.
या सन्मानाबद्दल वर्षाताई देशपांडे, सहशाला जाधव, डॉ. कुमार सप्तर्षी, आप्पा अनारसे, सुदाम दगड, पंडित तुपे, युवराज मगदूम, सचिन पांडोले तसेच युक्रांतीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. म्हसवड परिसरातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरातून पाठिंबा व्यक्त केला जात आहे.

