माण तालुक्यात टंचाई वाढली
माण तालुक्यात ६८ गावे टंचाईग्रस्त; ८ टँकर ने सुरू पाणीपुरवठा
दहिवडी : भरारी वृत्तसेवा
माण तालुक्यात वाढत्या पाणी व चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत घेण्यात आलेल्या विशेष आढावा बैठकीत गंभीर स्थिती समोर आली. तालुक्यातील एकूण 105 गावांपैकी तब्बल ६८ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली असून सध्या १३ गावे व ९० वाड्यांना ८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत टंचाईग्रस्त भागांतील सद्यस्थितीचा आढावा घेत तातडीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला ज्येष्ठ पार्श्वगायिका दिवंगत आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांचा पंचायत समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींकडून टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १३ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून १० प्रस्ताव मंजुरीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. उर्वरित प्रस्तावांची पडताळणी सुरू आहे. दरम्यान, पावसामुळे ४ प्रस्ताव व ऊरमोडी कालव्याचे पाणी उपलब्ध झाल्याने २ प्रस्ताव संबंधित ग्रामपंचायतींकडे परत पाठवण्यात आले आहेत.
पाणीटंचाईचा फटका केवळ नागरिकांनाच नव्हे तर पशुधनालाही बसत असल्याने जनावरांसाठीही टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सभेत करण्यात आली. सध्या पाचवड, टाकेवाडी आणि बिजवडी येथून यासंदर्भात प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील १४ पैकी ११ पशुवैद्यकीय संस्थांमध्ये अधिकारी कार्यरत असून जनावरांची देखभाल केली जात आहे.
वीज बिल थकबाकीमुळे काही ग्रामपंचायतींच्या पाणी योजनांची वीज जोडणी खंडित झाली आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतींनी अंशतः बिल भरून वीजजोडणी पुन्हा सुरू करून घ्यावी, जेणेकरून नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, अशा सूचना वीज वितरण कंपनीला देण्यात आल्या.
या बैठकीस उपसभापती सौ. प्रियांका जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, जी प सदस्या अलका जगदाळे, जी प सदस्या सोनाली पोळ, शितल रणपिसे, तसेच पंचायत समिती सदस्य बाळासाहेब कदम, अर्जुन काळे, उषा भोसले, राजाराम बोराटे, कल्पना विरकर, गौरी तुपे आणि गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Post Views: 77

