- @मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात प्रश्नांचा ऊहापोह
- @पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवर भर
- @वेगापेक्षा सत्य महत्त्वाचे – राजेंद्र दर्डा@पत्रकारांसाठी पेन्शन व आरोग्य योजनांची मागणी
भरारी वृत्तसेवा:उदगीर (लातूर) प्रतिनिधी
महाराष्ट्रातील पत्रकारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. मराठी पत्रकार परिषदेच्या 44 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मराठी पत्रकार परिषदेचे हे अधिवेशन उदगीर येथे मोठ्या उत्साहात पार पडत असून राज्यभरातून हजारो पत्रकार उपस्थित राहिले आहेत. व्यासपीठावर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, लोकमत समूहाचे संपादक राजेंद्र दर्डा, आमदार संजय बनसोडे, मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे, किरण नाईक,अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, , स्वाती हुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले की, पत्रकारांच्या प्रश्नांवर या अधिवेशनात सखोल चर्चा होणार असून सर्व निवेदने स्वतःकडे द्यावीत. या प्रश्नांवर मुख्यमंत्री स्तरावर बैठक घेऊन त्यांची सोडवणूक केली जाईल. पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठीही आपण पुढाकार घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रश्नावरही लवकरच तोडगा निघणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुद्रित माध्यमांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, लोकांचा वर्तमानपत्रांवरील विश्वास आजही कायम आहे. पत्रकारांचे योगदान मोठे असून त्यांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक भूमिका घेईल.
राजेंद्र दर्डा यांनी वेगापेक्षा सत्याला प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे संधीबरोबरच आव्हानेही निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्रकारांच्या निवृत्तीवेतन व आरोग्यविषयक मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
एस. एम. देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ज्येष्ठ पत्रकारांसाठी सुलभ पेन्शन योजना आणि अधिस्वीकृती नियम सुलभ करण्याची मागणी मांडली. आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर येथील पत्रकार भवनासाठी चार कोटींची मदत दिल्याची माहिती देत जिल्हा निर्मितीसाठी पाठिंबा मागितला.
कार्यक्रमात विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रारंभी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पुढारी चे सातारा जिल्हा निवासी संपादक हरीश पाटणे यांचे कौतुक
यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी हरीश पाटणे यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, “मित्र म्हणून त्यांनी मैत्रीही जपली आणि पत्रकार म्हणून आवश्यक तेव्हा टीकाही केली. ही दोन्ही नाती आम्ही जपली असून पुढेही जपू.”

