दहिवडी: भरारी वृत्तसेवा
“शिक्षणाच्या गुणवत्तेत तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही; चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान होईल, पण गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच,” असा ठाम आणि आक्रमक इशारा माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांनी दिला.
सातारा जिल्हा परिषद व शिक्षण विभाग, पंचायत समिती माण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुख्याध्यापक सहविचार सभा व आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत शिक्षणाच्या दर्जाबाबत स्पष्ट भूमिका मांडत, शाळांमधील शिस्त आणि गुणवत्ता या बाबींवर कुठलाही तडजोडीचा मार्ग स्वीकारला जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी उपसभापती प्रियांका जगदाळे, जिल्हा परिषद सदस्या सोनाली पोळ व शितल रणपिसे, पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, विद्या काटकर, गौरी तुपे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
सभापती विक्रम शिंगाडे पुढे म्हणाले, पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास जिल्हा परिषद शाळांचा आमूलाग्र बदल शक्य आहे. पटसंख्या वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करून शाळांचा लौकिक उंचावण्याचे आवाहन त्यांनी केले.
गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी माण तालुक्यातील शिक्षण विभागाचे काम राज्यासाठी आदर्श ठरावे असे असल्याचे सांगत शिक्षकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले.
पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकवणे अत्यावश्यक असल्याचे नमूद करत, “शिक्षण दर्जेदार असले पाहिजे, मुलांचे भविष्य घडले पाहिजे. कोणतीही अडचण आली तरी आम्ही शिक्षकांसोबत आहोत,” असे स्पष्ट केले.
विद्या काटकर यांनी पटसंख्या घटण्यामागील शहरीकरण, जन्मदरातील घट आणि इंग्रजी माध्यमाकडे वाढता ओढा ही कारणे असल्याचे सांगितले. मात्र गुणवत्तेच्या जोरावर ही परिस्थिती बदलता येऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गौरी तुपे यांनीही थेट प्रश्न उपस्थित करत, “शिक्षकांनी स्वतःची मुले जिल्हा परिषद शाळेत घातली नाहीत, तर इतर पालकांनी का घालावी?” असा मुद्दा मांडत आत्मपरीक्षणाची गरज व्यक्त केली.
शिक्षक प्रतिनिधी महेंद्र अवघडे यांनी सलग तीन वर्षांपासून आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम झाला नसल्याची खंत व्यक्त करत, तो दरवर्षी ५ सप्टेंबरला व्हावा अशी मागणी केली. तसेच ऑनलाईन कामाचा वाढता ताण कमी करण्याची मागणी करत, “शिकवण्यापेक्षा कागदपत्रांमध्येच वेळ जात आहे,” अशी नाराजी व्यक्त केली. कामिनी शिलवंत यांनीही मनोगत व्यक्त केले.
लक्ष्मण पिसे यांनी प्रास्ताविक केले. किरण बोराटे व शुभांगी बोबडे यांनी सूत्रसंचालन केले तर शिवाजी शिंगाडे यांनी आभार मानले.
फोटो… शिक्षकांचे सविचार सभेत बोलताना पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे शेजारी पंचायतसमिती सदस्य


