भोजलिंगाचा ‘स्वच्छता दूत’ तरस; जांभुळणीत जनजागृतीचा अनोखा उपक्रम ट्रेंडिंग
जांभुळणी (ता. माण) : माण तालुक्यातील भोजलिंग डोंगरावर वावरणारा दुर्मिळ ‘तरस’ (Striped Hyena) हा केवळ वन्यजीव नसून संपूर्ण परिसंस्थेचा नैसर्गिक ‘स्वच्छता दूत’ आणि ‘आरोग्यरक्षक’ असल्याचा प्रभावी संदेश देणारा जनजागृती उपक्रम जांभुळणी येथे उत्साहात पार पडला. जागतिक तरस दिनानिमित्त ‘किरकसाल संवर्धन प्रकल्पा’तर्फे श्री भोजलिंग मंदिर परिसरात आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी प्रकल्पाचे प्रमुख वन्यजीव संशोधक चिन्मय सावंत यांनी ग्रामस्थ व भाविकांशी संवाद साधत भोजलिंगाचा डोंगर हा केवळ धार्मिक स्थळ नसून तरसांसारख्या दुर्मिळ वन्यजीवांचा महत्त्वाचा अधिवास असल्याचे अधोरेखित केले. डोंगराच्या पठारावर आढळणारे ‘तराटी’ (Capparis divaricata) सारखे पुरातन व दुर्मिळ वृक्ष या भागाच्या समृद्ध जैवविविधतेचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यात्रेदरम्यान मटण, कोंबडी व इतर अन्नपदार्थांचा मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. हा कचरा फस्त करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे, तसेच दुर्गंधी व संभाव्य रोगराईपासून गावाचे संरक्षण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य तरस करत असतो. त्यामुळे तरस हा केवळ हिंस्त्र प्राणी नसून परिसंस्थेच्या आरोग्याचा नैसर्गिक रक्षक आहे, असे प्रतिपादन सावंत यांनी केले.
कचरा व्यवस्थापन व पाणी बचतीवर भर
जनजागृती कार्यक्रमात भाविक व ग्रामस्थांना डोंगर परिसरात कचरा न करण्याचे आणि प्लास्टिकसारख्या अपायकारक वस्तू टाळण्याचे आवाहन करण्यात आले. यात्रेच्या काळात निर्माण होणारा कचरा नियंत्रित ठेवणे, तसेच उन्हाळ्यात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी जबाबदारीने वागणे ही काळाची गरज असल्याचे सांगण्यात आले.
प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमास श्री भोजलिंग देवस्थानचे पुजारी श्री. बाबा शाहीर, वनविभागाच्या वळई-जांभुळणी बीटच्या वनरक्षक सरगर मॅडम, तसेच वळई व जांभुळणी गावचे ग्रामस्थ, तरुण व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनविभागातर्फे वनरक्षक सरगर मॅडम यांनीही वन्यजीव संरक्षण व सहअस्तित्वाबाबत मार्गदर्शन केले.
जागतिक तरस दिन (२० ते २७ एप्रिल) निमित्त आयोजित या उपक्रमामुळे भोजलिंग डोंगरावरील निसर्गदत्त वारसा जपण्यासाठी स्थानिक स्तरावर सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांचा सहभाग वाढत असल्याचे दिसून आले.

