गोंदवले येथे चाकू हल्ला; तरुणावर खुनाचा प्रयत्न, दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
दहिवडी भरारी वृत्तसेवा :
माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथे भरदिवसा चाकू हल्ला करून तरुणावर खुनाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना घडली असून, या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच हल्ल्यानंतर एक लाख रुपये लुटल्याचाही आरोप फिर्यादीने केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हणमंत लक्ष्मण दौंड (वय 32, रा. पळशी, ता. माण) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजण्याच्या सुमारास गोंदवले ते म्हसवड रस्त्यावर, गरीब नवाज मटन व चिकन शॉप समोरील बंद टपरीजवळ ही घटना घडली.
फिर्यादी हणमंत दौंड हे दाजी काळे व विनायक ढोले यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना आरोपी गणेश तात्याबा ढोले (रा. पळशी) याने त्यांना थांबवले. त्यानंतर बहिण भाग्यश्री हिला पळवून नेऊन लग्न केल्याच्या कारणावरून संतप्त होऊन आरोपीने फिर्यादीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या बरगडी, खांदा व डोळ्याखाली जखमा झाल्या.
दरम्यान, घटनास्थळी आलेल्या चार ते पाच अनोळखी इसमांनीही फिर्यादीला पकडून मारहाण केली, तसेच दाजी काळे व विनायक ढोले यांनाही मारहाण करण्यात आली. हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादीला रक्तस्त्राव होऊन तो खाली पडला. याच गोंधळात आरोपींपैकी कोणीतरी फिर्यादीच्या खिशातील सुमारे एक लाख रुपये काढून नेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
घटनेनंतर परिसरातील नागरिक जमा होऊ लागल्याने आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत तसेच दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि दराडे यांनी भेट दिली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. धोंगडे करीत आहेत.
पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

