दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
माण पंचायत समितीचा उपक्रम
दहिवडी भरारी वृत्तसेवा:
“दिव्यांग मुलांच्या आयुष्यात उजेड निर्माण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे सांगत माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे यांनी ५ टक्के स्वनिधीतून राबविण्यात आलेल्या साहित्य वाटप उपक्रमाचे कौतुक केले. समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत माण पंचायत समितीच्या वतीने तालुकास्तरीय साहित्य वाटप व डे केअर सेंटरमधील मुलांचे साहित्य वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या ५ टक्के स्वनिधीतून या साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, उपसभापती प्रियांका जगदाळे, गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे, जिल्हा परिषद सदस्य शितल रणपिसे, पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, विद्या काटकर व गौरी तुपे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन विविध साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये हालचालीस अडथळा असलेल्या मुलांसाठी ४ सीपी चेअर, ६ व्हील चेअर, ८ रोलेटर आणि १ कुबडी देण्यात आली. तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी २६ श्रवणयंत्रांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी विशेष शैक्षणिक किटचे नियोजन करण्यात आले होते. ० ते ३, ७ ते ११ आणि १२ ते १५ या वयोगटातील एकूण ३५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, समावेशित शिक्षण विभागाचे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले होते.

