मुंबई भरारी वृत्तसेवा
राज्यात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक
; 18 प्रकल्पांना हिरवा कंदील, 1 लाखांहून अधिक रोजगार
: राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल ₹2,56,137.01 कोटींच्या 18 विशाल व अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची 14 वी बैठक पार पडली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सोलर सेल, ग्रीन स्टील, हरित अमोनिया, इलेक्ट्रिक वाहन, लिथियम-आयन बॅटरी, संरक्षण व अवकाश साहित्य यांसारख्या उच्च तंत्रज्ञान क्षेत्रातील 18 प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्यात आले.
राज्यातील विविध भागांमध्ये हे प्रकल्प उभारले जाणार असून गडचिरोली, रायगड, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, भंडारा आदी जिल्ह्यांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील मोठ्या गुंतवणुकीमुळे स्थानिक रोजगाराला चालना मिळणार आहे.
रायगडमध्ये एस्सार एक्सप्लोरेशन अँड प्रोडक्शन कंपनीकडून सर्वाधिक ₹56,852 कोटींची गुंतवणूक होणार असून 25,000 रोजगार निर्माण होणार आहेत. गडचिरोलीतील रश्मी मेटलर्जिकल प्रकल्पातून 20,000 रोजगार निर्माण होणार आहेत.
या प्रकल्पांमुळे राज्यातील औद्योगिक विकासाला गती मिळणार असून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. तसेच संशोधन, नवकल्पना आणि पुरवठा साखळी मजबूत होण्यास मदत होणार आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांनाही या गुंतवणुकीचा मोठा फायदा होईल.
: महत्त्वाचे आकडे
• ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक
• 18 प्रकल्पांना मंजुरी
• 1 लाखांहून अधिक रोजगार
• सर्वाधिक गुंतवणूक : एस्सार (₹56,852 कोटी)
• सर्वाधिक रोजगार : रश्मी मेटलर्जिकल (20,000)
कुठं काय होणार?
• रायगड : सर्वात मोठे प्रकल्प
• गडचिरोली : 20 हजार रोजगार
• पुणे : इलेक्ट्रॉनिक्स व वाहन उद्योग
• नागपूर : क्लीनटेक व संरक्षण
• संभाजीनगर : ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक

