
@पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा पिंजून काढला!”
@राजकीय भेटीगाठी, भोजनाच्या चर्चांपासून आबांच्या पाठिंब्यापर्यंत; भाजपने विधानपरिषद रणांगण तापवले”
@भाजप अंतर्गत नाराजी,तसेच महायुती मधील घटक पक्षांना सोबत घेण्याचे शिवधनुष्य ना गोरे यांना पेलावे लागणार
पंढरपूर भरारी वृत्तसेवा :
विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपने प्रचाराची गती वाढवत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवार आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यांचा झंझावाती दौरा करत मतदारांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात झालेल्या राजकीय भेटीगाठींमुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी रिंगणात उतरत भाजपसमोर आव्हान उभे केले असले, तरी भाजप कोणताही धोका पत्करण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले. मात्र भाजप अंतर्गत नाराजी,तसेच महायुती मधील घटक पक्षांना सोबत घेण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. त्यातच मोहिते पाटील घराणे ही भाजप विरोधात प्रचारात सक्रिय झाल्याची चर्चा आहे.
शिवस्वराज्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून पालकमंत्री गोरे यांनी प्रचार मोहिमेची सुरुवात केली.
मोहोळ येथे माजी आमदार राजन पाटील यांच्याशी चर्चा, माढा येथे माजी आमदार धनाजी साठे यांच्या निवासस्थानी बैठक, तसेच रणजितसिंह शिंदे व पृथ्वीराज सावंत यांच्या संपर्क कार्यालयांना भेटी देत भाजपने मतदारांशी संपर्क अधिक दृढ केला.
करमाळ्यात आबांचा पाठिंबा चर्चेचा विषय
करमाळा दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार नारायण आबा पाटील यांनी भाजपला उघडपणे पाठिंबा दिल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले. यावेळी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल यांचीही उपस्थिती लक्षवेधी ठरली.
“मामांच्या घरी जेवण” ठरले चर्चेचे केंद्र
दौऱ्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या निमगाव येथील निवासस्थानी झालेला भोजन कार्यक्रम. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मामांच्या घरी दुपारचे जेवण घेतल्याने राजकीय समीकरणांबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.
माळशिरसमध्ये शक्तिप्रदर्शनाने सांगता
दिवसभराच्या दौऱ्याचा समारोप माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे झाला. माजी आमदार राम सातपुते यांच्या ‘श्रीराम’ निवासस्थानी झालेल्या बैठकीत मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते. या बैठकीस आमदार समाधान आवताडे यांचीही उपस्थिती होती.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने संपर्क, संवाद आणि संघटनशक्तीच्या जोरावर विजयाची तयारी सुरू केल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.
मात्र विरोधक पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा विजयाचा वारु रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
उद्या वाचा..झेड पी प्रमाणेच सातारा सांगली विधान परिषदेला महायुती च्या ठिकऱ्या उडणार का ?

