
सरकारी अधिकाऱ्याचा बनाव करून वृद्धेला दिवसा ढवळ्या लुटले
दहिवडी भरारी वृत्तसेवा :
माण तालुक्यातील वावरहिरे येथे गुरुवारी (दि. ४ जून) दुपारी एका अज्ञात व्यक्तीने सरकारी कामाशी संबंधित असल्याचा बनाव करून वृद्ध महिलेची फसवणूक करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली.दरम्यान चोरटा मोटारसायकल सह सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वावरहिरे येथील माजी सरपंच चंद्रकांत दादा वाघ यांच्या निवासस्थानी त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई मुकिंदा वाघ या दुपारी सुमारे साडेचार वाजण्याच्या सुमारास घरी एकट्या होत्या. यावेळी एक अज्ञात व्यक्ती घरात आला. त्याने स्वतःला शासकीय कामाशी संबंधित असल्याचे सांगत विविध प्रकारची चौकशी सुरू केली. बोलण्यात गुंतवून व विश्वास संपादन केल्यानंतर त्याने अचानक लक्ष्मीबाई वाघ यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ जबरदस्तीने ओढून तोडली काही सोने चोरटा घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.काही मणी तुटल्यामुळे खाली पडले.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे लक्ष्मीबाई वाघ या घाबरून गेल्या असून त्यांना मानसिक धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे. घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दरम्यान वावरहिरे गावातून फिरताना चोरटा व त्याची मोटारसायकल सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे.
या घटनेनंतर ग्रामस्थांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे. घरात येणाऱ्या अनोळखी व्यक्तींची खात्री करून घेणे, शासकीय अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्यांचे ओळखपत्र तपासणे, ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करणे तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलीस किंवा ग्रामपंचायतीला माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

