८ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयावर मोर्चाचा इशारा
दहिवडी हद्दीतील नव्या वस्त्यांना कायमस्वरूपी गावठाण वीजजोडणीचीही मागणी
दहिवडी भरारी वृत्तसेवा :
शिंगणापूर फीडरवरील सायंकाळी ६ ते १० या वेळेत सुरू असलेल्या लोडशेडिंगमुळे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून हे लोडशेडिंग तातडीने बंद करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व
सामाजिक कार्यकर्ते राजू मुळीक यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या १५ ते २० दिवसांपासून शिंगणापूर फीडरवर सायंकाळच्या महत्त्वाच्या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. स्वयंपाकाच्या वेळेत वीज नसल्यामुळे महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांना जनावरांचे दूध काढणे, चारा तयार करणे आणि इतर शेतीपूरक कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत.
लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या लोडशेडिंगचा फटका बसत असून नागरिकांमध्ये महावितरणबाबत तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. प्रशासन आणि महावितरणकडून याबाबत कोणतीही ठोस भूमिका दिसून येत नसल्याची खंतही व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय दहिवडी हद्दीतील भवानवाडी, शिवाजीनगर, मुळीकवस्ती, खरातवस्ती, एन.ए. प्लॉटिंग परिसर आणि शिवनगर या भागांना कायमस्वरूपी गावठाण वीजजोडणी देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
महावितरणने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा येत्या आठ दिवसांत शेतकरी व नागरिकांसमवेत महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. तसेच त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अध्यक्ष राजू मुळीक, नगरसेवक महेश जाधव, सतिश गलंडे,रामचंद्र मुळीक,मकरंद जाधव,गणेश विलास मुळीक, रघुनाथ मुळीक,अनिल जाधव, आशिष मुळीक,आदित्य जाधव, रितेश जाधव,ओम मुळीक,राणी शिंदे,वैशाली घाडगे यांच्या सह अनेक शेतकरी व महिला उपस्थित होत्या.

