माणच्या शिरपेचात दुहेरी मानाचा तुरा
स्वच्छता स्पर्धेत दहिवडी बसस्थानक प्रादेशिक प्रथम; म्हसवड बसस्थानक द्वितीय
दहिवडी भरारी प्रतिनिधी :


माण तालुक्याने राज्य परिवहन क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत स्वच्छता आणि प्रवासी सुविधांमध्ये नवा आदर्श निर्माण केला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या “बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर busस्थानक स्पर्धे”मध्ये ‘ब’ गटातून दहिवडी बसस्थानकाने प्रादेशिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला, तर ‘क’ गटात म्हसवड बसस्थानकाने द्वितीय क्रमांक मिळवत तालुक्याच्या शिरपेचात दुहेरी मानाचा तुरा खोवला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दहिवडी आगारात सुरू असलेल्या व्यापक बदलांचे हे यश मानले जात आहे. आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बसस्थानकाचा संपूर्ण कायापालट घडवून आणला. एकेकाळी मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणारे दहिवडी बसस्थानक आज आधुनिक, स्वच्छ आणि आकर्षक बसस्थानक म्हणून ओळखले जात आहे.
पूर्वी पाण्यासाठी टँकरवर अवलंबून असलेल्या आगाराने लोकसहभागातून दोन बोअरवेल उभारून कायमस्वरूपी पाणीप्रश्न सोडवला. प्रवाशांसाठी आरओ शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली. बसस्थानक परिसरात वृक्षारोपण, कारंजे, आकर्षक बगीचे आणि नियमित स्वच्छता मोहिमेमुळे परिसराला नवे रूप प्राप्त झाले आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्म बोर्ड, सुशोभित दत्त मंदिर परिसर, प्रशस्त बसण्याची व्यवस्था आणि “माणदेश दर्शन” एलईडी देखावा यामुळे बसस्थानकाला सांस्कृतिक व पर्यटनाची विशेष ओळख मिळाली आहे. या देखाव्यातून माण तालुक्यातील तीर्थक्षेत्रे, सामाजिक व आध्यात्मिक वारसा तसेच एसटीच्या स्थापनेपासूनचा इतिहास प्रवाशांना अनुभवता येत आहे.
दहिवडी आगारामार्फत तीर्थक्षेत्र सहलींचे आयोजन करून प्रवाशांना विशेष सुविधा दिल्या जात आहेत. स्वच्छतेसाठी जागोजागी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या असून सफाई कर्मचारी सविता दाहिंजे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे बसस्थानक कायम स्वच्छ आणि टापटीप राहते. “माणदेश हरित उद्यान” उपक्रमांतर्गत ३०० हून अधिक वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्यात आले आहे.
राज्यस्तरीय स्वच्छ सर्वेक्षण समितीने वर्षभरात चार वेळा दहिवडी बसस्थानकाची पाहणी केली होती. या सर्व प्रयत्नांची दखल घेत दहिवडी बसस्थानकाला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशामध्ये आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल, सेवानिवृत्त वाहतूक निरीक्षक दादासाहेब भुजबळ, वाहतूक निरीक्षक बाबुराव खाडे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अर्जुन भोईटे, ॲडमिन दादासाहेब खाडे, वाहतूक वरिष्ठ लिपीक संतोष शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
दहिवडी आणि म्हसवड बसस्थानकांच्या या यशामुळे माण तालुक्याचा राज्य परिवहन क्षेत्रात नवा आदर्श निर्माण झाला असून प्रवाशांकडूनही या उपक्रमांचे कौतुक होत आहे.

