दहिवडीत सलग दुसऱ्या दिवशी दारू माफियांवर पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा;
@ दोन दिवसांत साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त
ओमनी गाड्यांतून सुरू होती विदेशी दारूची चोरटी वाहतूक; दहिवडी पोलिसांची आक्रमक मोहीम
दहिवडी भरारी वृत्तसेवा :
माण तालुक्यात अवैध दारू वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात दहिवडी पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई करत दारू माफियांचे धाबे दणाणून सोडले आहे. दोन दिवसांत स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी तब्बल ५ लाख ४४ हजार २४० रुपयांचा विदेशी दारूसह चारचाकी वाहनांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पहिली कारवाई रविवारी (दि.१८) सायंकाळी दहिवडी-मायणी मार्गावरील सिद्धनाथ मंगल कार्यालयासमोर करण्यात आली. पोलिसांनी संशयित पांढऱ्या रंगाची मारुती ओमनी (एमएच ११ सीक्यू १३२२) अडवून तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी दारूचा साठा आढळून आला. यामध्ये क्लासिक गोल्ड, रॉयल स्टॅग, बडवायझर मॅग्नम, मॅकडॉवेल नं.१, मास्टर डिलाईट आदी ब्रँडच्या शेकडो सीलबंद बाटल्यांचा समावेश होता. या कारवाईत ३ लाख १३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पांडुरंग बाळू जाधव (रा. लाडेगाव) व संदीप श्रीकांत कुंदप (रा. पुसेसावळी) यांच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यानंतर सोमवारी (दि.१९) रात्री दहिवडी-गोंदवले मार्गावरील स्वाती मंगल कार्यालयासमोर आणखी एक धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी पांढऱ्या रंगाची ओमनी गाडी (एमएच १२ एनयू ८९४३) पकडून तपासणी केली असता त्यामध्ये इम्पेरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, मॅकडॉवेल्स, किंगफिशर स्ट्रॉंग, बडवायझर मॅग्नम या विदेशी दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या. या कारवाईत २ लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी प्रकाश बाबुराव घोडके (रा. गोंदवले) याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही कारवाया सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. पी. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. पहिल्या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल गणेश खाडे यांनी फिर्याद दिली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. ए. खाडे करत आहेत. दुसऱ्या कारवाईत पोलीस शिपाई सहदेव साबळे यांनी फिर्याद दिली असून तपास एएसआय चंद्रहार खाडे करीत आहेत.
दहिवडी पोलिसांनी अवैध दारू वाहतूक आणि विक्रीविरोधात उघडलेली मोहीम आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत असून, सलग दोन दिवसांच्या कारवाईमुळे दारू तस्करांचे जाळे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

