संस्कार पवारांच्या पुढाकारातून रानमळा-पिंगळी मार्ग खुला; अपूर्ण काम केले पूर्ण

दहिवडी भरारी वृत्तसेवा:
वारसा हा केवळ नावाचा नसतो, तर तो संस्कारांचा, सामाजिक बांधिलकीचा आणि लोकहिताच्या कामांचा असतो, हे दहिवडीतील संस्कार अजित पवार यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. गेल्या दीड वर्षांपासून रखडलेला आणि खडक ओढ्यावरील पूल वाहून गेल्यामुळे बंद पडलेला रानमळा-पिंगळी मार्ग अखेर लोकसहभागातून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या कामामुळे ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंदवले रस्ता तसेच खंडसरी चौक ते दहिवडी रस्त्याचे काम सध्या सुरू असताना रानमळ्यातील खडक ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने या भागातील संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यातच १३ बंधारे ओसंडून वाहत असल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर बनला होता. अनेक गावांतील नागरिकांना दहिवडी गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने वेळेत पोहोचण्यासाठी नागरिकांची प्रचंड तारांबळ उडत होती. रानमळा, कृषी कार्यालय परिसर, शेलारवस्ती, पिंगळी आणि वाघमोडेवाडी येथील शेतकऱ्यांचेही मोठे हाल होत होते.
नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन पाणी फाउंडेशनचे समन्वयक मा. नगरसेवक अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र संस्कार पवार यांनी पुढाकार घेतला. १६ मे रोजी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचे नियोजन केले. कमलेश जाधव आणि राजू सकुंडे यांच्या सहकार्याने एक जेसीबी आणि दोन ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली.
१७ मे रोजी सकाळपासूनच युद्धपातळीवर कामाला सुरुवात करण्यात आली. प्रशासनाकडून लाखो रुपयांचा खर्च अपेक्षित असलेले काम युवकांच्या जिद्दीने आणि लोकसहभागातून अवघ्या काही हजार रुपयांत पूर्ण करण्यात आले. आज दुपारपासून हा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून रस्ता तयार झाला असला तरी पुलाच्या अभावामुळे वाहतूक ठप्प होती. आता हा अडथळा दूर झाल्याने पिंगळी, शेलारवस्ती आणि रानमळा परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. संस्कार पवार यांच्या या ‘झिरो बजेट मॉडेल’ची सध्या संपूर्ण माण तालुक्यात चर्चा सुरू असून नागरिकांकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
या कामात पिंगळी, शेलारवस्ती, रानमळा परिसरातील ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अजित पवार व दहिवडीचे नगराध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी या कामाचे पाहणी करून मदत करणाऱ्या सर्व तरुणांचे कौतुक केले.

