प्रभाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाने पंचायत समिती सदस्यांमध्ये नवचैतन्य
“शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा; पाच वर्षांची संधी जनसेवेसाठी वापरा”
दहिवडी भरारी वृत्तसेवा :
केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामीण विकासासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ गावागावातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन राज्याचे माजी आयुक्त तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पंचायत समिती सदस्यांमध्ये नवचैतन्य आणि नव्या उत्साहाची भावना निर्माण झाली.
माण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचायत समिती सदस्यांनी प्रभाकर देशमुख यांच्या कार्यालयास भेट दिली. यावेळी प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाच्या आधारे त्यांनी सदस्यांना प्रभावी लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचे मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना प्रभाकर देशमुख म्हणाले की, पंचायत समिती सदस्यांनी गावपातळीवर जाऊन जनतेशी थेट संवाद साधावा. शासनाच्या विविध विभागांतून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती नागरिकांना समजावून सांगून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. समाजातील तळागाळातील घटकांना न्याय देणे ही लोकप्रतिनिधींची मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी, महिला व ग्रामीण युवकांसाठी कृषी विभाग, नाबार्ड तसेच पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून विविध योजना उपलब्ध आहेत. विहिरी, शेततळी, शेळीपालन, कुक्कुटपालन यांसारख्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
“जनतेने दिलेली पाच वर्षांची संधी ही विश्वासाची असते. त्या संधीचे सोनं करत लोकहिताची कामे करा,” असा संदेशही त्यांनी सदस्यांना दिला.
यावेळी पंचायत समिती सभापती विक्रम शिंगाडे, उपसभापती प्रियांका जगदाळे तसेच कल्पना वीरकर, गौरी तुपे आणि विद्या काटकर उपस्थित होत्या.

