- दहिवडी भरारी वृत्तसेवा : माण तालुक्यातील दहिवडीत शुक्रवारी (दि. ८ मे) भरदिवसा घरफोडीचा थरार घडला. मात्र नागरिकांच्या जागरूकतेमुळे चोरट्यांचा डाव अक्षरशः हाणून पाडण्यात आला. घरफोडीच्या प्रयत्नानंतर पळ काढणाऱ्या संशयितांचा नागरिकांनी पाठलाग करत एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात आणखी तीन संशयितांना ताब्यात घेत कारवाईची झपाटलेली मोहीम राबवली.या प्रकरणी जबरी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली कार तसेच धारदार शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.ताब्यात घेतलेल्यांमध्ये रुपेश महादेव बनसोडे, सूरज जगन्नाथ सावंत (दोघे रा. जाशी, ता. माण) तसेच कुंतण शामराव राठोड व रोहन भगवान कांबळे (दोघे रा. लोहगाव, पुणे) यांचा समावेश आहे.याप्रकरणी वनिता विलास जगदाळे (वय ४५, रा. सेवागिरी बंगला, डंगारे मंगल कार्यालयामागे, दहिवडी) यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, त्या आपल्या मुलीसह घरात जेवण करत असताना दोन अनोळखी इसम घराचे गेट उघडून आत शिरले. त्यातील एक जण कंपाउंडमधील बोलेरो वाहनामागे लपून बसला होता, तर दुसरा गेटबाहेर थांबला होता. संशय आल्याने वनिता जगदाळे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे घाबरलेल्या संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला.पळताना त्यांनी वापरलेली कार घरासमोरच सोडून दिली. तसेच त्यांची बॅगही तेथेच पडली असून, त्यामधून धारदार शस्त्रे सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.घटना दाट वस्तीच्या भागात घडल्याने नागरिकांनी तात्काळ पाठलाग सुरू केला. यावेळी एका संशयिताला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पकडलेल्या संशयिताकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तातडीने पोलिस पथके रवाना केली. त्यानंतर लपून बसलेल्या अन्य संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.या धाडसी कारवाईमुळे दहिवडीतील नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेचा पुढील तपास हवालदार बापुराव खांडेकर करीत असून, प्रभारी अधिकारी दत्तात्रय दराडे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
फोटो ..चोरी करण्यासाठी आणण्यात आलेली कार चोरीच्या ठिकाणी टाकून चोर पळाले.


